top of page

'हर घर दुर्गा' अभियानाचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते शुभारंभ


मुंबई, 28 सप्टेंबर: समाजातील स्त्रियांना सशक्त आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ‘हर घर दुर्गा’ अभियानाची सुरुवात 30 सप्टेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेत आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि *द केरला स्टोरी* चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या तरुणींना मोफत स्वरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या प्रशिक्षणात आठवड्यातून 2-3 वेळा तासिका आयोजित केल्या जातील. या उपक्रमात शासकीय औद्योगिक संस्थांतील विद्यार्थिनींबरोबरच इतर महिलाही सहभागी होऊ शकतात. तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण दिले जाईल.

मंत्री लोढा यांनी या उपक्रमाच्या महत्त्वावर भर देत, आत्मसंरक्षण हे इतर शैक्षणिक विषयांप्रमाणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. नवरात्र उत्सवाच्या काळात स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येईल, तसेच सर्व मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी या अभियानाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्थेचे होणार आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये HP कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल एक्सलन्स सेंटरचे उद्घाटनही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे.

Comentários


bottom of page