top of page

संजय राऊत यांच्या टीकेला शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांचा सडेतोड प्रत्युत्तर


शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार किरण पावसकर यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे. त्यांनी राऊत यांना त्यांच्या मर्यादा ओळखायला सांगितलं आहे. पावसकर म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या सारख्या नेत्यांना एका झटक्यात घरी बसवलं, त्यामुळेच तुमची पोटतिडीक वाढली आहे."

पावसकर यांनी राऊत यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. "पत्राचाळीतला भ्रष्टाचार आणि कोविड काळात मातोश्रीवर कसा पैसा पोचवायचा, इतकाच तुमचा अभ्यास आहे," असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. गरीब महिलांना १५०० रुपये मिळत असताना तुमच्या पोटात दुखतंय. तुम्हाला या रकमेची किंमत कळत नाही, कारण तुम्हाला फक्त भ्रष्टाचारातून १५ हजार कोटी लुबाडून मातोश्रीवर कसे पोहचवायचे, हेच माहित आहे."

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर शिंदे यांनी पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी केल्या, महिलांना एसटीत ५०% सूट दिली, वय ७५ वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली. "हे तुम्हाला का जमलं नाही?" असा सवाल पावसकरांनी राऊतांना विचारला.



शेवटी, पावसकरांनी राऊत यांना इशारा दिला, "पुढे मुख्यमंत्र्यांवर टीका केलीत, तर तुमच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांचे पेम्प्लेट्स छापून आम्ही जनतेत वाटू."

शिवसेनेच्या या प्रत्युत्तरामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

bottom of page