
12 February 2025
मुंबई, पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली. या प्रकल्पाच्या गतीसाठी ‘महामेट्रो’ व राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रकल्पात चांगले विकसक मिळावे यासाठी 99 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
पुणेकरांसाठी महत्त्वाचा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत सांगितले की, शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा निर्णय पुणे शहराच्या वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा म्हणून महामेट्रो व परिवहन महामंडळाने तातडीने आवश्यक संमती व सामंजस्य करार पूर्ण करावेत. महाराष्ट्र दिन (1 मे 2025) या दिवशी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) होणार प्रकल्प उभारणी
शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्त्वावर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चटई क्षेत्राचा उपयोग करून आर्थिक गुंतवणूक सुलभ केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ‘महामेट्रो’ ही प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार असून, ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात लवकरच नव्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे.
स्वारगेट बसस्थानकाचाही समावेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर बसस्थानकासोबतच स्वारगेट येथेही अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुणे शहराच्या वाहतुकीस अधिक सुव्यवस्थित आणि प्रभावी बनवले जाणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
✅ आधुनिक बसस्थानकासह व्यावसायिक संकुलाची उभारणी.
✅ वाहनतळासाठी दोन तळघर.
✅ किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट.
✅ बसस्थानक तळमजल्यावर, बसआगार पहिल्या मजल्यावर, बसवाहनतळ दुसऱ्या मजल्यावर.
✅ शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी 16 मजली इमारत.
पुणेकरांसाठी आधुनिक वाहतूक सुविधा मिळणार
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शिवाजीनगर बसस्थानक हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल आणि पुणेकरांना जलद व सुयोग्य वाहतूक सुविधा मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे.