top of page

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; अंतिम उमेदवारांची संख्या 4,140

मुंबई, दि. 5: महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, एकूण 288 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत एकूण 4,140 उमेदवार अंतिम यादीत आहेत.

मतदान केंद्रे आणि मतदारांची संख्या वाढली: राज्यात एकूण 1,00,186 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून त्यात शहरी भागातील 42,604 तर ग्रामीण भागातील 57,582 केंद्रे आहेत. पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये 1,181 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या 6,41,425 असून एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या 9.70 कोटी आहे.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तयारी: निवडणुकीसाठी 2,21,600 बॅलेट युनिट्स, 1,21,886 कंट्रोल युनिट्स आणि 1,32,094 व्हीव्हीपॅट्स उपलब्ध आहेत. या यंत्रणांची प्रथम स्तर तपासणी पूर्ण झाली आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा आढावा: आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात 46,630 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण 252.42 कोटी रुपयांच्या बेकायदा मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे, ज्यात 63.47 कोटींची रोख रक्कम आणि 32.67 कोटींचे ड्रग्ज यांचा समावेश आहे.

सी-विजिल ॲप आणि तक्रारींचे निवारण: निवडणुकीदरम्यान सी-विजिल ॲपवर प्राप्त झालेल्या 2,469 तक्रारींपैकी 99.31% तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, सर्व यंत्रणा मतदारांना सुयोग्य, सुरक्षित आणि शांततापूर्ण मतदानाचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

bottom of page