top of page

विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद, प्राणीप्रेमींनी अनुभवली देश-विदेशातील विविध प्रजाती


मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) - मुलुंड पश्चिम येथील सेंट पायस एक्स हायस्कुल येथे दोन दिवस चाललेल्या जागतिक दर्जाच्या श्वान प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आज मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला. या प्रदर्शनात भारतीय आणि विविध जातींच्या विदेशी श्वानांच्या प्रजाती पाहण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळाली होती.



आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉग शो, ज्यासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या प्रदर्शनाचे आयोजन जीवनदान संस्थेच्या अध्यक्षा, राजोल संजय पाटील यांनी केले होते. त्यांनी सांगितले की, "सामान्य नागरिकांना आणि विशेषत: मुलांना देश-विदेशातील विविध प्राणी आणि पक्षी सहज पाहता यावेत, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते."

प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे साऊथ आफ्रिकेतील एक विशाल पाल होती. सुमारे साडे पाच फुट लांबीच्या या पालीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ह्या पालीचे आयुष्य किमान 20 वर्षांचे असते, आणि इतक्या मोठ्या पालीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव अनेकांनी घेतला.

शेवटच्या दिवशी झालेल्या डॉग शोने उपस्थितांचे मन जिंकले. श्वानांचे विविध खेळ, त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे प्रदर्शन आणि त्यांच्या मालकांशी असलेले स्नेहपूर्ण नाते पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. या प्रकारच्या प्रदर्शनांनी लोकांना प्राण्यांबद्दलची आवड आणि कुतूहल वाढवण्यास मदत होते, असे अनेक प्राणीप्रेमी पालकांनी सांगितले.

प्रदर्शनाच्या आयोजनामुळे मुलुंडकरांनी एका वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे अशा उपक्रमांची आवश्यकता आणि महत्व अधोरेखित झाले आहे.

Comments


bottom of page