top of page

विदर्भ- मराठवाड्यात घडणार नवी दुधक्रांती: दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू


मुंबई, १३ ऑगस्ट: राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि पशुपालन व दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यांत दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात दुध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकल्पामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

प्रकल्पामध्ये उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप, गायी म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम, चारा-पिकांसाठी अनुदान, आणि शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण यांसारख्या घटकांचा समावेश आहे.

विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम तसेच मराठवाड्यातील नांदेड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांचा या प्रकल्पात समावेश आहे. नागपूर येथे मदर डेअरीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

Commentaires


bottom of page