5 January 2025
पुणे: “देशात विचार भिन्नता ही समस्या नाही; विचार शून्यता ही खरी समस्या आहे,” असे परखड मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित विशेष गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, “सत्तेच्या मागे धावणारे नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्तिमत्त्वाचा विकास व सामाजिक बांधिलकी यावर भर दिला पाहिजे. पैसा जीवनात महत्त्वाचा असला तरी तो सर्वस्व नाही. त्याचबरोबर आरोग्य व चांगल्या विचारांनाही समान महत्त्व दिले पाहिजे.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय घोगरे होते, तर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, आमदार रेखा खेडेकर, माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके, डॉ. मारोतराव मुळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी 'क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
गडकरी यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितले की, “ते खऱ्या अर्थाने सेक्युलर राजे होते. त्यांनी धर्म, जात, भाषा या पलीकडे जाऊन समाजासाठी काम केले.”
पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या भाषणात मराठा सेवा संघाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. शासकीय सेवेत काम करत असताना सामाजिक संघटन उभे करण्याची कसरत व तरुणांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या, याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर बनबरे यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा खेडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ खेडेकर, संतोष शिंदे, उत्तम कामठे, अविनाश मोहिते यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
Video
- मिम टाइम्स न्यूज डेस्क