top of page

वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ व मत्स्यव्यवसाय प्रकल्पांची घोषणा


पालघर, 30 ऑगस्ट - वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात आणि 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे शुभारंभ आज पालघरमधील सिडको मैदानावर झाला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह विविध केंद्रीय व राज्य मंत्र्यांची उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी संबोधित करतांना सांगितले की, वाढवण बंदर हा देशातील सर्वात मोठा आणि खोल पाण्याचा बंदर बनणार आहे. या प्रकल्पामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार असून, रेल्वे व महामार्गांशी जोडले जाऊन या भागात नवनवीन व्यापार सुरू होतील. या प्रकल्पामुळे 12 लाख रोजगार निर्माण होणार असून, स्थानिकांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना लाभ होईल.

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या बंदरामुळे देशातील व्यापार व औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल. हा प्रकल्प 76,200 कोटी रुपये खर्चून उभारला जाणार आहे आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या दृष्टिकोनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

याशिवाय, प्रधानमंत्री मोदींनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात 757.27 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरण आणि फिश मार्केटचे बांधकाम यांचा समावेश आहे. तसेच, 364 कोटी रुपये खर्चून एक लाख मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याची योजना सुरू केली आहे. हे ट्रान्सपॉन्डर मच्छिमारांची सुरक्षितता सुनिश्चित करेल आणि संकटाच्या वेळी संपर्क साधण्यासाठी सहाय्य करतील.

या प्रकल्पांमुळे सागरी क्षेत्रातील विकासासोबतच, आदिवासी व मच्छिमार बांधवांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी नवीन संधी निर्माण होतील, असे मोदी यांनी सांगितले.

Comments


bottom of page