top of page

‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही, दरमहा रकमेत वाढ करण्याची योजना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


कोल्हापूर, दि. 23: 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अतिशय महत्त्वाची ठरत आहे. ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात योजनेतील दरमहा मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर येथे झालेल्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना वचनपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 1 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला असून, 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळत आहे."

शिंदे यांनी पुढे सांगितले की, "योजनेचा लाभ कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केला जाऊ नये, यासाठी सर्व बँकांना कडक निर्देश दिले आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठीही शासन कटिबद्ध आहे."

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, "महिलांना आर्थिक सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे, आणि सप्टेंबर अखेर आणखी अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, यासाठी शासन प्रयत्नशील आहे."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत सांगितले की, "राज्य सरकार शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे, आणि यासाठी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे पालन करीत आहे."

कार्यक्रमात 'लाडकी बहीण' योजनेतील 10 महिला लाभार्थी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 6 लाभार्थी, तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 5 अंगणवाडी सेविकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना आश्वासन दिले की, राज्य सरकार त्यांच्यापाठीशी ठामपणे उभे राहील.

Comments


bottom of page