top of page

रेकॉर्डब्रेक पावसातही मुंबई नॉन स्टॉप!


यंदाच्या पावसाळ्यात एकाच दिवसात २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस कोसळल्याच्या आतापर्यंत तब्बल चार वेळा घटना घडलेल्या असतानाही मुंबई महानगर अखंडपणे धावले आहे. महत्वाचे म्हणजे जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झालेली असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सदैव प्रत्यक्ष क्षेत्रावर अथकपणे कार्यरत राहीली. या अंमलबजावणीमुळे मुंबईकरांना सुसह्य अनुभव आला आहे. पाणीपुरवठा, आरोग्य या नागरी सेवा-सुविधांसह रस्ते वाहतूक, उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या यंत्रणेने अथक प्रयत्न केले आहेत.

मुसळधार पाऊस होत असतानाही मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून अविरतपणे सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर (ऑन फिल्ड) अखंडपणे सज्ज राहण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी यापूर्वीच दिले आहेत. तसेच, सखल भागांमधील पाण्याचा जलद निचरा व्हावा, यासाठी सर्व अचूक नियोजन करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी वेलरासू यांनी देखील सर्व संबंधितांना दिल्या होत्या. या सर्व निर्देशांची योग्य व प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याने मुंबईतीन जीवनमान सुरळीत राहीले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी वेलरासू म्हणाले की, यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत चार दिवस असे होते की जेव्हा २०० मिमी हून अधिक पाऊस कोसळला आहे. त्यामध्ये २४ जून २०२३ (२२५ मिमी), २८ जून २०२३ (२२८ मिमी), १९ जुलै २०२३ (२०३ मिमी) आणि २१ जुलै २०२३ (२१३ मिमी) यांचा समावेश आहे. तरीही मुंबई ठप्प झाली नाही. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे अतिसखल भागांपैकी हिंदमाता, गांधी मार्केट (शीव), मिलन भूयारी मार्ग याठिकाणी देखील पाण्याचा निचरा त्वरेने झाला आहे. कारण या परिसरांमध्ये पाणी निचरा होण्यासाठी भूमिगत साठवण टाक्या, पाणी उपसा करणारे उच्च क्षमतेचे पंप इत्यादी उपाययोजना केल्या आहेत. तुलनात्मक सांगायचे झाले तर, या सखल भागांमध्ये प्रकल्पांची अंमलबजावणी होण्याआधी सरासरी किमान पाच ते सहा तास इतका कालावधी पाणी निचरा होण्यासाठी लागत होता. पाणी साचल्याने याठिकाणी वाहतूकदेखील ठप्प होत होती. आता मात्र कितीही जोरदार पाऊस झाला तरी सरासरी अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये पाण्याचा निचरा केला जातो. त्यामुळे या परिसरांमधील स्थानिक, व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे, सोबत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या प्रकल्पांची मदत होत आहे, असे श्री. वेलरासू यांनी नमूद केले.

शीव (सायन) येथील गांधी मार्केट परिसरात २०२१ मधील पावसाळ्यापर्यंत सरासरी ३ फूट ते ४ फूट इतके पाणी साचत होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी किमान ८ तास ते १० तास इतका वेळ लागत होता. परिणामी रस्ते वाहतूक ठप्प होत असे. याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी स्टील रायझिंग चॅनेलचा वापर करत १२०० मिमी व्यासाची रचना करण्यात आली. या चॅनेलमध्ये छोट्या कलव्हर्टच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आणि जोडीला चार पंप लावण्यात आले. परिणामी आता पाण्याचा निचरा वेगाने होत आहे. याआधी ९ जूनला २०२१ मध्ये २०० मिमी पावसाच्या प्रसंगी ३.५ फूट ते ४ फूट साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सरासरी १० तासांचा कालावधी लागला होता. मात्र, यंदा २१ जून २०२३ च्या पावसात १०४ मिमी पाऊस कोसळूनही अवघे ४ इंच पाणी जमा झाले आणि त्याचा तत्काळ निचरा झाला.

मुंबईतील अतिसखल भागांपैकी परळमधील हिंदमाता हा एक परिसर आहे. या परिसरात असणारी मोठी व महत्त्वाची रूग्णालये, स्थानिक रहिवासी तसेच व्यापाऱ्यांनाही या परिसरात जोरदार पावसाने साचणाऱया पाण्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पूर्वी सरासरी ४ फुटापर्यंतचे पाणी या परिसरात साचत होते. परिणामी रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असे. या समस्येवर उपाय म्हणून सेंट झेव्हियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान याठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. सुमारे ६.४८ कोटी लीटर इतकी त्यांची साठवण क्षमता आहे. पावसाचे पाणी उपसा पंपाच्या माध्यमातून या टाक्यांमध्ये साठवले जाते. नंतर, ओहोटी असतानाच्या काळात हे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यात येते. हिंदमाता परिसरात २०२१ मध्ये सरासरी ३ फूट साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी किमान सहा तासांचा कालावधी लागत होता. यंदा २१ जुलै रोजी १०४ मिमी पाऊस कोसळूनही अवघे ४ इंच पाणी साचले. या पाण्याचा संपूर्ण निचरा होण्यासाठी अवघ्या ३० मिनिटांचा कालावधी लागला.

पश्चिम उपनगरातील द्रुतगती मार्गाला जोडणारा, सांताक्रुझ स्थित मिलन भूयारी मार्ग येथे यापूर्वी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या भेडसावत होती. याठिकाणी ३ कोटी लीटर क्षमतेची भूमिगत पाणी साठवण टाकी बांधण्यात आली आहे. भूयारी मार्गात येणारे पावसाचे पाणी पंपांच्या सहाय्याने उपसून या टाक्यांमध्ये साठवले जाते. नंतर ओहोटीच्या काळात ते समुद्रात सोडले जाते. याआधी ९ जून २०२१ मध्ये मिलन सबवे येथे ३ फूट पाणी साचले होते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी सात तासांचा कालावधी लागला होता. यंदाच्या पावसाळ्यात मिलन सबवे येथे पाणी साचल्याचा प्रकार एकदाही घडलेला नाही.

मुंबईतील पावसाची वार्षिक सरासरी विचारात घेता, कुलाबा हवामान केंद्रानुसार २३१० मिमी तर सांताक्रुझ हवामान केंद्रानुसार २७८४ इतकी पावसाची सरासरी आहे. या निकषानुसार विचार करता, यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या म्हणजे २०२२ च्या पावसाळ्याच्या तुलनेत अधिक पाऊस कोसळला आहे. यंदा २७ जुलै २०२३ पर्यंत मुंबई शहरात सरासरीच्या ७५.१० टक्के म्हणजे १७३४.८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. तर उपनगरात सरासरीच्या ८०.७३ टक्के म्हणजे २७८४ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षासोबत या पावसाची तुलना केल्यास २७ जुलै २०२२ मध्ये मुंबई शहरात ५८.१७ टक्के म्हणजे १३०३. मिमी पाऊस झाला होता. तर उपनगरामध्ये ५६.७४ टक्के म्हणजे १५३४.८ मिमी पाऊस नोंदवला गेला होता. थोडक्यात, याच दिवशी २०२२ च्या तुलनेत यंदा अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने मुंबई महानगरात पाणी उपसा करणारे एकूण ४७७ पंप लावले आहेत. पाणी साचणाऱया सखल भागात पाणी उपसा करणारे पंप सुरू करण्यासाठीचा समन्वय हा पर्जन्य जलवाहिन्या आणि आपत्कालीन विभाग यांच्यामध्ये साधला जातो. या समन्वयामुळे रस्ते वाहतूक तसेच रेल्वे वाहतूक यंदाच्या पावसाळ्यात सुरळीत राहीली आहे. पावसाळ्यात पाणी साचणाऱया सर्व सखल भागात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, कामगारांची टीम कार्यक्षेत्रावर कार्यरत आहे. अंधेरी सबवे सारख्या सखल ठिकाणी वाहतूक सुरळीत रहावी म्हणून या भागात २४ तास मनुष्यबळ तैनात आहे, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले यांनी दिली आहे.


Comentários


bottom of page