top of page

राणी बागेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ सुरु पहिल्या दिवशी उसळली गर्दी

31 January 2025


सचिन उन्हाळेकर


मुंबई : मुंबई पुष्पोत्सवाची मुंबईकर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. या उत्सवात मुंबई आणि उपनगरांतील शाळांच्या सहली देखील भेट देतात. पर्यावरणाचे अभ्यासक, छायाचित्रकारही या प्रदर्शनासाठी उत्सूक असतात. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते आज (दिनांक ३१ जानेवारी २०२५) पुष्पोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या दिवशीच हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली.

भारताची राष्ट्रीय प्रतिके फुलांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे ही यंदाचा ‘मुंबई पुष्पोत्सव’ अर्थातच वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामागची संकल्पना आहे. यंदाच्या प्रदर्शनात फुलझाडांसह वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, औषधी-सुगंधी वनस्पती, वेली तसेच भाजीपाला आणि मसाल्यांची रोपे मांडण्यात आली आहेत. अत्यंत कष्टाने आणि प्रतिभेने हे प्रदर्शन सजविले आहे. मुंबईकरांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.


यंदाचे वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे २८ वे वर्षे आहे. यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवाच्या  संकल्पनेत भारताच्या राष्ट्रीय प्रतिकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आहे. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून भारताच्या प्रतिकांचे दर्शन घडविण्यात आले. झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी साकारलेला तिरंगा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतोय. भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती लाकडी कलाकृतीच्या माध्यमातून साकारली आहे. राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याची रचना झेंडूच्या फुलांनी तयार केली आहे.  राष्ट्रीय जलचर असलेले गंगा डॉल्फिन पांढऱ्या आणि गुलाबी रंगांच्या शेवंतीच्या फुलांनी साकारले आहे. यासह कमळ, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय वृक्ष वड, अशोक स्तंभ, गंगा नदी, मोर आदी प्रतिकेही मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.  सुमारे १० हजार फुलांच्या वृक्षांचा  समावेश प्रदर्शनात करण्यात आलेला आहे. सुंदर आणि मनमोहक प्रदर्शन करण्यामागे उद्यान विभागाच्या सुमारे २५० अधिकारी - कर्मचारी यांची तीन महिन्यांची मेहनत असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.


मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे मुंबई पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे.



आज झालेल्या मुंबई पुष्पोत्सव च्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) चंदा जाधव, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी


म्हणाले की, फुलांना पाहून कोणलाही उल्हासित वाटते. या पुष्पोत्सवातून हा हेतू साध्य होणार आहे. याचबरोबर आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक संपदेचे जतन कसे करावे, त्याची कशी काळजी घ्यावी, त्याबाबत कोणती माहिती आपल्याकडे हवी, यासाठी देखील हे प्रदर्शन मुंबईकरांसह पर्यटकांना उपयोगी ठरणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.


शनिवारी, रविवार सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत पुष्पोत्सव राहणार खुला



शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी; शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी आणि रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ असे तीनही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.



राष्ट्रीय प्रतिकांनी वेधले लक्ष


पर्यावरणपूरक मांडणी


बागेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे, खतांचेही प्रदर्शन येथे मांडण्यात आले आहे. तसेच निवडुंग प्रजातींचे प्रदर्शनही आहे. तसेच वेगवेगळ्या बोन्साय प्रजातींची आकर्षक मांडणी, औषधी वनस्पती, क्रेप पेपरच्या फुलांचे प्रदर्शन आणि सेल्फी पॉइंटही साकारण्यात आला आहे.

विशेष दालने आणि विक्री केंद्रे


पुष्पोत्सवात देशी-विदेशी रोपांची विक्रीसाठी दालने खुली करण्यात आली आहेत. तसेच कृषी साहित्य, कीटकनाशके, फवारणी यंत्रे आणि शेतीसंबंधित साधनांचेही खरेदी-विक्रीची ५० हून अधिक दालने आहेत.

bottom of page