top of page

राज्यात दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे निर्णय: मुख्यमंत्री शिंदे



मुंबई, दि. १२ ऑगस्ट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पानमांजर (ऑटर), गिधाड आणि रानम्हैस यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजनन केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रजनन केंद्रांची स्थापना पेंच, नाशिक आणि गडचिरोली येथे करण्यात येणार आहे.


राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाला राज्यभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यासाठी सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम प्रामुख्याने राबविला जाणार आहे. याशिवाय, राज्यातील १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच, तातडीने उपचार मिळण्यासाठी 'क्लिनिक ऑन व्हील' उपक्रम सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्याला वन विभागात वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.


बैठकीला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जावळीच्या जंगलात संशोधन व विकास केंद्र उभारण्याचे निर्देश दिले, जेथे ५०० प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. मेडिकल टुरिझमला प्राधान्य देत जंगलातील दुर्मिळ वनस्पतींचे जतन करण्याच्या दृष्टीनेही पुढील पावले उचलण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


बैठकीत संरक्षित क्षेत्र आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील चार विकास प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली.

Comments


bottom of page