मुंबई, ४ ऑक्टोबर: आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकराज्य जुलै-ऑगस्ट २०२४ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह उपस्थित होते.
या विशेष अंकात मागील दोन वर्षांतील राज्य शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांचे लेख या अंकात सादर करण्यात आले आहेत, ज्यात शासनाच्या विविध निर्णयांवर त्यांच्या विचारांची मांडणी करण्यात आली आहे.
या अंकातील खास वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या “माझी लाडकी बहीण” या नव्याने सुरू केलेल्या योजनेचा आढावा आणि या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अनुभवांची मांडणी.
विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांचा या अंकात समावेश करण्यात आल्याबद्दल मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या अंकामधून लोकांना राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती मिळेल.