top of page

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी मास्टिक पद्धतीने खड्डे बुजवणार


ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना देण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या महामार्गाची पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ मास्टिक पद्धतीने बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या .आज पावसाने उसंत घेतल्याने मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दूरध्वनीवरून दिले. तसेच मुंबई व परिसरातील रेल्वे स्थानकांजवळचे रस्ते, रेल्वे मार्गावर पाणी साचणारी ठिकाणे आदी तातडीने स्वच्छ करून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले. तसेच एमएमआरडीच्या अखत्यारित येत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या सूचनाही एमएमआरडीए आयुक्तांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहे |

コメント


bottom of page