top of page

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गणेशभक्तांसाठी कोकणातील टोल माफीचा निर्णय


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गणेशभक्तांसाठी कोकणातील टोल माफीचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, ४ सप्टेंबर २०२४: गणेशोत्सवाच्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ५ सप्टेंबर २०२४ ते १९ सप्टेंबर २०२४ दरम्यान मुंबई-बंगळुरु आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवरील तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर पथकर (टोल) माफी मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी १४ ऑगस्ट २०२४ रोजी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत पथकर माफीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित शासन निर्णय प्रकाशित केला आहे.

गणेशभक्तांसाठी 'गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन' असे स्टीकर्स स्वरूपाचे पथकर माफी पास जारी करण्यात येणार आहेत. या पासमध्ये वाहन क्रमांक, चालकाचे नाव यासारखी माहिती असेल आणि हे पास परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व संबंधित आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिले जातील. हा पास परतीच्या प्रवासासाठीही वैध राहील.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठीही टोल माफीचा लाभ मिळणार आहे. गणेशोत्सवासाठी वापरल्या जाणाऱ्या बसेससाठी संबंधित जिल्ह्यातील पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून पास मिळवता येईल.

पोलीस व परिवहन विभागांना गणेशोत्सवाच्या काळात या पास सुविधांची माहिती नागरिकांना पुरविण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

Comments


bottom of page