top of page

*मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुर

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर

सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे- आवाहन

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज बुधवार दिनांक २६ जुलै २०२३ रात्री ८ वाजेपासून उद्या गुरूवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.

दरम्यान, अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा.

भारतीय हवामान खात्याने मुंबईत आज (दिनांक २६ जुलै २०२३) रात्री ८ वाजेपासून उद्या (दिनांक २७ जुलै २०२३) दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांनी दरडप्रवण क्षेत्रात आणि धोकादायक इमारत स्थळी आपले पथक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासह तैनात ठेवावे, तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी यंत्रणेला दिले आहेत. तसेच मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने संपूर्ण अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने प्रत्यक्ष क्षेत्रावर दक्ष राहण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.


Comments


bottom of page