top of page

मुंबईत भव्य मराठी दांडीयाचे आयोजन, पारंपरिक मराठी पेहरावात दांडीयाचा आनंद घायला भाजपा आणि सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचे आवाहन,विजेत्यांना आयफोन बक्षीस दिले जाणार आहे

मुंबई, २ ऑक्टोबर २०२४: भारतीय जनता पार्टीच्या वतीने यंदा सलग तिसऱ्या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे आयोजन करण्यात आले आहे. काळाचौकी येथील अभ्युदय नगरमध्ये हा उपक्रम पार पडणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा, महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ, आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.



या भव्य मराठी दांडीयाचा हा तिसरा वर्ष आहे, आणि यंदा तो पाच ऐवजी सात दिवस चालणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला पारंपरिक मराठी पेहरावात दांडीयाचा आनंद घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आ. मिहीर कोटेचा यांनी सांगितले की, "मुंबईतील पहिला मराठी दांडिया भाजपाने सुरू केला आहे, आणि गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे."

यंदा मराठी पेहरावात उत्तम सादरीकरण करणाऱ्या एका पुरुष व एका महिलेच्या विजेत्यांना आयफोन बक्षीस दिले जाणार आहे. जर गुणांमध्ये बरोबरी झाली, तर दोन्ही विजेत्यांना आयफोन मिळणार असल्याचे आ. कोटेचा यांनी स्पष्ट केले. या मराठी दांडीयासाठी नि:शुल्क प्रवेश पत्रिका भाजपाच्या मध्य व दक्षिण मुंबईतील कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत, ज्यासाठी ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.



भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सर्वांना मोठ्या संख्येने या मराठी दांडीयाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच अवधूत गुप्ते यांनीही उपस्थितीला प्रोत्साहन देत म्हटले, "आमचे वादक सज्ज आहेत, आणि मी सुद्धा या दांडीयाचा ठेक्यावर गाण्यासाठी तयार आहे. मराठी संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावे."

चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती, वाद्यवृंदाचा ताल, आणि उत्तम संयोजनामुळे या वर्षीचा मराठी दांडिया विशेष रंगतदार ठरणार आहे.

Comments


bottom of page