top of page

मुंबईत गणपती विसर्जनामुळे बेस्ट बस मार्गांमध्ये बदल, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन बेस्ट आणि पोलिसांनी केले आहे.

मुंबई, मोहम्मद रेहान

17 September 2024


गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले असून, अनेक बस मार्गांचा प्रवास परावर्तित करण्यात आला आहे.

1) लालबाग: लालबाग येथे गणपती विसर्जनामुळे बस मार्ग क्रमांक 1, 4, 5, 6, 7, 8, 11, 14, 19, 21, 22, 25, आणि 51 हे बस मार्ग लालबाग पुलावरून परावर्तित करण्यात आले आहेत. सकाळी ९.३० वाजल्यापासून हा बदल लागू करण्यात आला आहे.

2) प्रभादेवी: प्रभादेवीतील फीत वाला मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे बस मार्ग क्रमांक 167 हा संत रोहिदास चौक येथे खंडित करण्यात आला आहे. सकाळी १०.०० वाजल्यापासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

3) खानविलकर चौक: गणपती विसर्जनाच्या गर्दीमुळे बस क्रमांक 57 आणि 14 या बस गाड्या खानविलकर चौकातून आचार्य दोंदे मार्गाने एलफिन्स्टन ब्रिजकडे वळून नियोजित मार्गाने पुढे जात आहेत. हा बदल सकाळी ११.०० वाजल्यापासून लागू आहे.

4) चेंबूर: चेंबूर वसाहत ते देवनार आगार दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बस मार्ग क्रमांक 21, 362, 364, 399, आणि 663 या बस गाड्या चेंबूर नाका, आर. के. स्टुडिओ मार्गे प्रवास करतील. सकाळी ११.३० वाजल्यापासून हा बदल लागू आहे.

5) पी.एल. लोखंडे मार्ग: चेंबूर येथे गणपती मिरवणूक असल्यामुळे पी.एल. लोखंडे मार्गावर वाहतूक बंद आहे. त्यामुळे बस मार्ग क्रमांक 379, 380, आणि 377 हे जिजामाता भोसले मार्गाने छेडा नगर आणि अमर महालमार्गे परावर्तित करण्यात आले आहेत. हा बदल दुपारी १२.१५ वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे.

6) सह्याद्री नगर: गणपती विसर्जनामुळे बस क्रमांक 608 आणि 612 या बस गाड्या सह्याद्री नगर येथे दुपारी १.०० वाजल्यापासून खंडित करण्यात आल्या आहेत.

7) काशिमिरा-भाईंदर रोड: गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे काशिमिरा-भाईंदर रोडवरील बस मार्ग क्रमांक 706, 707, 709, 718, आणि C72 या बस गाड्यांचे प्रवर्तन दुपारी ३.०० वाजल्यापासून खंडित करण्यात आले आहे.

8) लालबागचा राजा मिरवणूक: लालबागचा राजा मिरवणूक भारत माता जंक्शनवर आल्यामुळे बस मार्ग क्रमांक 65 च्या बस गाड्या लालबाग पुलावरून एस ब्रिज मार्गे सात रस्त्याकडे परावर्तित करण्यात आल्या आहेत. हा बदल दुपारी ३.१० वाजल्यापासून लागू आहे.

वरील सर्व बदल गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन बेस्ट आणि पोलिसांनी केले आहे.

bottom of page