
2 March 2025
मुंबई , अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाहनांच्या आरटीओ नंबर प्लेटच्या दरांबाबत सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात नंबर प्लेट बनवण्याचे दर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहेत. यासंदर्भात योग्य त्या आकडेवारीसह स्पष्टता देण्यात आली आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर भाष्य करताना सांगितले की, “वाहनचालक आणि नागरिकांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी शासन सतर्क आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात नंबर प्लेटसाठी सर्वात वाजवी दर ठरवण्यात आले आहेत.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले की, “काही राज्यांमध्ये नंबर प्लेट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते, मात्र महाराष्ट्र सरकारने हा दर नियंत्रित ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक बचत होईल.”
पत्रकार परिषदेत सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करताना, सर्व राज्यांची आकडेवारी सादर करण्यात आली. महाराष्ट्रात लागू असलेल्या दरांची तुलना इतर राज्यांशी करण्यात आली असून, हे दर कमी असल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिक आणि वाहनचालक संघटनांनी दिली आहे.