top of page

महायुतीत तणाव: निवडणुकीआधी फुटण्याचे संकेत - महेश तपासे यांचा दावा


मुंबई, १९ ऑगस्ट: आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीत तणाव आणि फुटीचे संकेत दिसत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन केले असल्याचा आरोप त्यांनी केला.


तपासे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने आधी शिवसेनेला फोडले आणि नंतर शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी राष्ट्रवादी फोडली, परंतु महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला त्यांची जागा दाखवली, याची आठवण करून दिली.


अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान भारतीय जनता पार्टीने त्यांना काळे झेंडे दाखवले, तसेच भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना कुचकामी ठरवण्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. या घटनांमुळे महायुतीमध्ये तणाव वाढल्याचे तपासे यांनी सांगितले.


महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, तसेच एकमेकांबद्दल आदर नसल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करण्याऐवजी सत्ता मिळवणे आणि स्वतःवरील खटले बंद करून घेणे, एवढ्याच उद्दिष्टासाठी महायुती स्थापन झाल्याचा आरोप त्यांनी केला.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय परस्पर घेण्याचा प्रयत्न अजित पवार करत असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सरकारी खर्चातून होणाऱ्या या योजनेत विरोधी पक्षांच्या नेत्यांना का बोलावले जात नाही, असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला आहे.

Comments


bottom of page