
25 January 2025
मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी जाहीर केले. अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, भायखळा येथे आयोजित ‘बालकोत्सव २०२४ – २०२५’ च्या समारंभात ते बोलत होते.
बालकोत्सवांतर्गत आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अंतिम लोकनृत्य स्पर्धा’ व ‘पथनाट्य स्पर्धा’ यामध्ये विशेष मुलांनी सादर केलेल्या पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली. “दिव्यांग विद्यार्थ्यांनी दाखवलेली कला, आत्मविश्वास आणि सादरीकरण यामुळे त्यांच्या क्षमतांवर माझा पूर्ण विश्वास आहे. या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे डॉ. सैनी यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धेतील विजेते गट

लोकनृत्य स्पर्धेत के पश्चिम विभागातील मुंबई पब्लिक स्कूल कामा मार्ग उर्दू शाळेच्या ‘चरी नृत्य’ (राजस्थानी नृत्य) गटाने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक एफ उत्तर विभागातील मुंबई पब्लिक स्कूल काणे नगर सीबीएसई शाळेच्या ‘रेंगमा नागालँड नृत्य’ गटाने मिळवला, तर तृतीय क्रमांक मुंबई पब्लिक स्कूल मेघराज शेट्टी उर्दू शाळेच्या ‘डांगी नृत्य’ गटाने पटकावला.
पथनाट्य स्पर्धेतही उत्कृष्ट सादरीकरण पाहायला मिळाले. अशोक वन मराठी शाळेच्या ‘एकच ध्यास – गुणवत्ता विकास’, विक्रोळी पार्कसाईट शाळेच्या ‘सायबर सुरक्षा – काळाची गरज’, आणि बापूराव जगताप मार्ग उर्दू शाळेच्या ‘भारतीय संविधान – देशाची शान’ या पथनाट्यांना विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

कार्यक्रमाची सुरुवात विशेष मुलांनी सादर केलेल्या ‘I am able, give me time’ या प्रेरणादायी पथनाट्याने झाली. यानंतर मुंबईतील विविध महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी आठ राज्यांतील लोकनृत्ये सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या सोहळ्याला उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे यांच्यासह अनेक अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
‘बालकोत्सव’ सारख्या उपक्रमांमुळे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रात अधिक संधी मिळत आहेत. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळेल आणि कलागुण अधिक खुलतील, असे कार्यक्रमाच्या शेवटी सर्वानी नमूद केले.