top of page

मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन,पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं

Updated: Aug 30, 2023

अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या मागण्यांबाबत पंधरा दिवसात बैठक मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

अप्पर-वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं. १५ हून अधिक शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून ‘आम्हाला न्याय द्या’ अशी मागणी सरकारकडे केली. यावेळी मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांची मोठी धावपळ उडाली. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं.

धरणग्रस्तांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही, असं सांगत धरणग्रस्त गेल्या १०५ दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. पण, अद्यापही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आज सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आंदोलन केलं.

अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन व अनुषांगिक मागण्यांबाबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. त्यासाठी या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय यांबाबत सर्वंकष आढावा घेऊन माहिती तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रकल्प बाधितांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा बैठकीत संवाद साधला. या प्रकल्पामुळे अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील 42 गावे बाधित झाली आहेत. यातील बांधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन, धरणग्रस्तांसाठी प्रतिक्षा यादी तयार करणे, ज्यांना नोकरी शक्य नाही, त्यांना नुकसान भरपाई अशा विविध पर्यायांबाबत चर्चा झाली. या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रकल्पबाधितांच्या मागण्यांबाबत सर्वंकष आढावा घेण्यात यावा. त्यासाठी डेटाबेस तयार करण्यात यावा, त्यानंतर येत्या पंधरा दिवसांत याबाबत बैठक आयोजित करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

Comments


bottom of page