top of page

मंत्रालयात पत्रकारांना दुपारी २ नंतरच प्रवेश : गृह विभाग पत्रकार संघटनांच्या विरोधामुळे सरकारची माघार.

5 April 2025


मुंबई ,गृह विभागाच्या परिपत्रकानुसार पत्रकारांना दुपारी २ नंतरच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. पत्रकारांच्या एकतेपुढे झुकत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करत हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश दिले.

२४ मार्च रोजी गृह विभागाने काढलेल्या परिपत्रकात मंत्रालयात केवळ दुपारी २ नंतरच पत्रकारांना प्रवेश मिळेल, असे नमूद करण्यात आले होते. या निर्णयामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचे स्पष्ट होत होते, त्यामुळे राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

या पार्श्वभूमीवर मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष श्री. दिलीप सपाटे, सरचिटणीस श्री. दीपक भातुसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुद्द्याचे गांभीर्य ओळखून मुख्यसचिव व गृह विभागाला तात्काळ आदेश देत वादग्रस्त परिपत्रक मागे घेण्याचे निर्देश दिले. पत्रकारांच्या एकतेने आणि संघर्षाने हा विजय मिळवला असून, हा निर्णय पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतोय.

bottom of page