
28 December 2024
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा केली आहे. पक्ष संघटन, अनुशासन, आणि सक्रिय सदस्यता वाढविण्यासाठी या समित्या नेमण्यात आल्या आहेत.
1. प्रदेश संघटनपर्व समिती
प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून संघटनपर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली आहे.
2. प्रदेश अनुशासन समिती
प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुण्याचे योगेश गोगावले यांना सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे.
3. प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान
प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाचे प्रमुख म्हणून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, बीड येथील प्रवीण घुगे यांना अभियानाचे सहप्रमुख बनवण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या तीनही समित्यांच्या नियुक्त्या अधिकृत पत्राद्वारे जाहीर केल्या आहेत. या समित्या पक्षबांधणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.