top of page

भाजप सरकारचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात - काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप


भाजप सरकारचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात - काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप
भाजप सरकारचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात - काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप

पुणे, ४ सप्टेंबर २०२४: राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, असे आरोप काँग्रेस नेत्यांनी आज पुण्यात आयोजित आढावा बैठकीत केले. या बैठकीत काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांसह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

रमेश चेन्नीथला यांनी भाजप युती सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, "राज्यात हत्या, खून, दरोडे, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कायदा व सुव्यवस्थेकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आहे, तर दुसरीकडे फक्त पैसा वसुल करण्यावर सरकारचे लक्ष आहे." तसेच पुण्यातील वाहतूक व्यवस्थेची अत्यंत बिकट अवस्था असून, यामुळे आय.टी. कंपन्यांना देखील फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, "पोलीस आयुक्तांपासून ते शिपायांपर्यंतच्या पदांवर पैसे घेऊन बदल्या केल्या जात आहेत. पुण्यातील ५०० कोटींची जमीन केवळ ७० कोटींना विकून कॅन्सर हॉस्पिटलसाठी राखीव असलेल्या जागेचा घोटाळा करण्यात आला आहे."

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की, "सरकारने मुंबई विकली आणि महाराष्ट्राची अस्मिता गुजरात दरबारी गहाण ठेवली आहे. पुण्यात ड्रग्ज आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एस.टी. महामंडळाच्या संपावर भाजप सरकारने मौन धारण केले आहे."

या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यभरातील जनतेमध्ये सरकारविरोधी भावना निर्माण करण्यासाठी संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली असून, राज्यातील जनतेला भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती देण्याचे ठरवले आहे.

Comments


bottom of page