भंडाऱ्यात वाळूचे अवैध उत्खनन : दोन महसूल अधिकारी निलंबित, महसूल मंत्र्यांचा कठोर निर्णय
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Apr 9
- 1 min read

9 April 2025
मुंबई : भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात वाळूच्या अवैध उत्खनन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांचा समावेश आहे.
या कारवाईमागील पार्श्वभूमी अशी की, नागपूर विभागीय महसूल आयुक्तांच्या चौकशीत हे दोन्ही अधिकारी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अवैध उत्खननास परवानगी दिली तसेच साठेबाजीस पाठिंबा दिला, असे आरोप चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहेत.
विधानसभेत भंडाऱ्यातील अवैध रेती उत्खनन, डंपर अपघात व जखमींना नुकसान भरपाई मिळावी याबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी सात दिवसांत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले होते. चौकशी अहवाल प्राप्त होताच त्यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले.
चौकशीदरम्यान स्पष्ट झाले की पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी नसताना रेतीघाटांमधून मोठ्या प्रमाणावर वाळूचे उत्खनन केले जात होते. ही बाब अत्यंत गंभीर मानून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
“अवैध वाळू उत्खनन आणि साठेबाजी ही सामान्य जनतेच्या हक्कावर गदा आणणारी बाब आहे. महाराष्ट्रात कुठेही असा प्रकार आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांनी याबाबत सतर्क राहावे,” असे आवाहन महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.
ही कारवाई महसूल विभागासाठी एक इशारा ठरू शकते, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण शासनाने अंगीकारल्याचे स्पष्टपणे दिसून येते.