top of page

बैलगाडा शर्यतीला मान्यता,ही देवेंद्र फडणवीसांची देण, भाजपा गटनेते प्रविण दरेकर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी पुढाकार घेतला. राज्य सरकारने विधिमंडळात कायदा पारित केला आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बैलगाडी शर्यतीचा खेळ आज जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला आहे. खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतीला मान्यता ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देण आहे, असे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले. सांगलीच्या रेठरेधरण येथे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आणि अमोल पाटील युवा शक्ती पुरस्कृत आयोजित केलेल्या 'देवेंद्र फडणवीस चषक भव्य बैलगाडा शर्यती' वेळी ते बोलत होते.

यावेळी आ. दरेकर म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात बैलगाडी शर्यतीवर बंदी आली होती. परंतु सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी पुढाकार घेतला आणि बैलगाडा शर्यतीमध्ये काम करणारी अनेक लोकं होती त्यांनी सुप्रीम कोर्टात पिटीशन केले. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मनावर घेतले. राज्य सरकारने विधिमंडळात कायदा पारित केला आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बैलगाडी शर्यतीचा खेळ आज जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला आहे. या खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अशा प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे.

सदाभाऊ खोत हे खेड्यातील शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करताहेत. कुठलाही राजकीय वारसा त्यांना नाही. कुठलीही आर्थिक शक्ती मागे नाही, असे असतानाही एका प्रामाणिकपणाच्या जोरावर शेतकऱ्यांसाठी आंदोलने करतात. बैलजोडी, बैलगाडी ही आपली शेतकऱ्यांची ओळख आहे. म्हणून येथे मोठ्या संख्येने शेतकरी जमले आहेत. पुढच्या वर्षी हा कार्यक्रम जोरात करा. आणखी काही बक्षिसे लागली तर मुंबईतून आम्ही देऊ. तसेच हे सरकार आपले आहे. या सरकारच्या माध्यमातूनही जी काही मदत लागेल ती उभी करू, असे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी आयोजकांना दिले.

तत्पूर्वी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, या शर्यतीचे हे दुसरे पर्व आहे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाने शेतकऱ्यांच्या शेतीला दुय्यम व्यवसाय म्हणून, दर्जा म्हणून प्राप्त झालेली ही बैलगाडा शर्यत आहे. या शर्यतीवर बंदी आल्यानंतर विधानसभेत कायदा केला आणि सुप्रीम कोर्टात हा माणूस लढाई लढला. म्हणून त्यांच्या नावाने महाराष्ट्रात 'देवेंद्र फडणवीस केसरी' आम्ही पहिल्यांदा सुरू केली. पुढील वर्षी ४ लाख ५५ हजाराचे पहिले बक्षीस देणार आहोत. दरवर्षी एक-एक लाखाने हे बक्षीस वाढवत नेणार आहोत. कारण ग्रामीण भागातील देशी गायीला वाचवण्याचे काम खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हणून त्यांच्या नावाने ही शर्यत ठेवली असल्याचे खोत म्हणाले.

यावेळी दरेकर यांचे कौतुक करताना खोत म्हणाले की, या व्यक्तिमत्वाला मी जेव्हा-जेव्हा हाक मारली त्या-त्यावेळी सह्याद्रीचा पर्वत जसा धावून आला तसे प्रविण दरेकर हे माझ्या पाठीशी कायम धावून आले.

याप्रसंगी भाजपा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख, स्पर्धेचे आयोजक अमोल पाटील, सागर खोत, सम्राट महाडिक, बजरंग भोसले, सुभाष बापू, नायब तहसीलदार यादव मॅडम, के. डी. पाटील, सनी पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

コメント


bottom of page