top of page

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई २५ मीटर सरकवली


२५ मीटर सरकवली
२५ मीटर सरकवली

अंधेरी, ५ सप्टेंबर २०२४ - अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) २५ मीटरपर्यंत सरकविण्याचे काम यशस्वीपणे पार पडले आहे. या महाकाय तुळईचे एकूण ८६ मीटर सरकवणे आवश्यक आहे, त्यापैकी २५ मीटरचा टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे.

सदर कार्यवाही पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून करण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या परवानगीनंतर आणि पुढील रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर उर्वरित तुळई सरकवण्याचे काम केले जाईल. गोखले पुलाचा पहिला टप्पा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि हलक्‍या वाहनांना प्रवेश देण्यात आलेला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लोखंडी तुळई स्थापन करण्याचे काम सुरू झाले आहे.

तुळईचे प्रत्येक भाग १.० मीटर रूंदीच्या पदपथासह १३.५ मीटर रूंद (३ अधिक ३ मार्गिका) आणि ९० मीटर लांबीचे आहे. त्याचे वजन सुमारे १३०० मेट्रिक टन आहे. उंचीच्या बाबतीत, दुसऱ्या टप्प्यातील तुळई १४ ते १५ मीटर उंचीवरून ७.५ मीटर पातळीपर्यंत खाली आणण्यात येईल.

पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे.

Kommentare


bottom of page