8 January 2025
छत्रपती संभाजीनगर शहरातील साजापूर शिवारातील खवड्या डोंगरावर एक हृदयद्रावक ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. चुलत भावाने बहिणीचे प्रेम प्रकरण सहन न झाल्याने तिला २०० फूट उंच डोंगरावरून ढकलून तिचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत मुलीचे नाव नम्रता शेरकर (१७) असून, आरोपी भावाचे नाव ऋषिकेश शेरकर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशने गोड बोलून नम्रताला डोंगरावर नेले आणि नंतर तिचा विश्वासघात करून तिला ढकलून दिले. या भयंकर घटनेत नम्रताचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला लवकरच अटक होईल, असे सांगण्यात आले आहे. या घटनेने समाजाला हादरवून सोडले असून ऑनर किलिंगसारख्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अशी अमानवी घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.