11 January 2025
मुंबई,बृहन्मुंबई महानगरपालिका आणि 'विवान्त अनटेम्डअर्थ फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथील एन. जी. आचार्य उद्यानात (डायमंड गार्डन) भरविण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवाचे आज शनिवारी (दिनांक ११ जानेवारी २०२५) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एम पूर्व) श्रीमती अलका ससाणे, राज्य माहिती आयुक्त डॉ. प्रदीप व्यास, महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, 'विवान्त अनटेम्डअर्थ फाऊंडेशन' चे डॉ. संजीव शेवडे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध पर्यावरण संरक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
'फुलपाखरांचे संवर्धन आणि शहरी अधिवास' अशी या महोत्सवामागची संकल्पना आहे. फुलपाखरूंच्या संवर्धनासाठी मुंबईकरांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी हा महोत्सव भरविण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नागरिकांना फुलपाखरूंच्या विविध प्रजातींची माहिती व्हावी, यासाठी उद्यानात फुलपाखरूंच्या छायाचित्रांसह त्यांची माहिती असलेले छायाचित्र प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनालाही आयुक्त श्री. भूषण गगराणी आणि उपस्थितांना भेट दिली. विविध बचत गटांनी या ठिकाणी स्टॉलही लावले होते. त्यांच्याकडे फुलपाखरांच्या आकाराचे हातमोजे विक्रीसाठी उपलब्ध होते.
परिसरातील मुंबईकरांना या महोत्सवाची माहिती व्हावी आणि फुलपाखरूंबाबत जनजागृती व्हावी, यासाठी आज शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी मुलांनी फुलपाखरांच्या संवर्धनासाठीचे विविध संदेश देणारे फलक हातात धरले होते.
फुलपाखरांच्या संवर्धनासाठी घेतली प्रतिज्ञा
या महोत्सवाच्या निमित्ताने उद्यानात चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली. मुले सकाळपासून चित्र काढण्यात आणि रंगविण्यात गुंग झाली होती. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर आयुक्तांसह उपस्थित मान्यवरांनी या मुलांशी गप्पा केल्या. तसेच यावेळी फुलपाखरू संवर्धनासाठी सार्वजनिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. आयुक्त श्री. गगराणी यांनी स्वत: ही प्रतिज्ञा उपस्थितांना वाचून दाखविली.
प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, चित्रकला स्पर्धा
चित्रप्रदर्शानसह फुलपाखरू महोत्सवात प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय महोत्सवात फुलपाखरांना समर्पित असे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच फुलपाखरू अभ्यासक आणि फुलपाखरूप्रेमींसाठी तज्ज्ञांकडून आणि 'सिटिझन सायंटिस्ट'कडून सादरीकरण, मुलांसाठी 'ओरिगामी' व कोड्यांचे क्विझ असे कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी अभ्यासक करणार सादरीकरण
रविवार, १२ जानेवारी रोजी 'फुलपाखरांच्या अद्भुत विश्वाची एक सफर' या विषयावर तज्ज्ञ आणि हौशी अभ्यासक यांची सादरीकरणे होतील. 'फुलपाखरांचे संवर्धन आणि शहरी अधिवास' या विषयावर एक परिसंवाद होणार आहे.