top of page

प्रतीक्षानगर आगारात बेस्ट चालकांचे आंदोलन, गर्भवती महिला वाहक प्रकरण चिघळले

13 January 2025


मुंबई,प्रतीक्षानगर बेस्ट आगारात चालक व कर्मचार्‍यांनी आंदोलन करत कामकाज ठप्प केले आहे. या आंदोलनाचे कारण गर्भवती महिला वाहक सुप्रिया एस. कदम यांना हलक्या कामावर नेमण्याच्या मागणीवरून सुरू झालेले वादळ आहे.


माथाडी कामगार युनियनचे सचिव प्रदीप मगरे यांनी आगार व्यवस्थापक सलीम खत्री यांची भेट घेऊन, सुप्रिया कदम यांना गाड्यांवर ड्युटी देण्याऐवजी हलक्या कामावर नेमावे अशी विनंती केली होती. या चर्चेदरम्यान गैरसमज निर्माण होऊन वाद चिघळला आणि प्रदीप मगरे व महिला वाहक सुप्रिया कदम यांनी व्यवस्थापक सलीम खत्री यांना मारहाण केली, असा आरोप आहे.


सदर प्रकारानंतर प्रकरण वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. बेस्ट उपक्रमाचे सुरक्षा अधिकारी, मातेश्वरी कंपनीचे आगार व्यवस्थापक, आणि माथाडी कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांसह महिला वाहक पोलीस स्टेशनला उपस्थित होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.


घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षानगर व धारावी आगारातील वेटलीज कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले. परिणामी, अनुक्रमे ११० आणि १०० बसेसच्या सेवांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीला सामोरे जावे लागले.


या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता असून आंदोलनामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

Video

bottom of page