top of page

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नसीम खान आणि वर्षा गायकवाड नजरकैदेत, पोलिसांचा कडक बंदोबस्त


मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात आंदोलन होऊ नये, म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांना त्यांच्या निवासस्थानीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हे सर्व केवळ विरोधकांना दडपून टाकण्यासाठीचे प्रयत्न आहेत. आम्ही शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या या कृतीतून लोकशाही धोक्यात येत आहे," असे लोंढे यांनी म्हटले आहे.

कोंकणातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना नजरकैदेत ठेवून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

हा प्रकार विरोधकांच्या अधिकारांचे उल्लंघन असून, सरकारच्या या दडपशाहीविरोधात आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहू, असा इशारा देखील अतुल लोंढे यांनी दिला आहे.

Comments


bottom of page