top of page

*******नवीन वर्ष, नवीन संक्लप, नवीन दिशा*******

31 December 2024


जीवन हे एक प्रवास आहे, ज्याचा आरंभ जन्माच्या क्षणापासून होतो आणि शेवट मृत्यूपाशी. आपण सारे या प्रवासातील वाटसरू आहोत. नवीन वर्ष हे या प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जिथे आपण थांबून स्वतःचा मागोवा घ्यावा, भूतकाळाचे मूल्यमापन करावे आणि भविष्याचा मार्ग निश्चित करावा. नववर्ष हे फक्त एक तारखांचा बदल नाही; हे आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे सूचक आहे, जिथे आपण जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो.


     संपूर्ण जग नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करते. फटाके फुटतात, सण साजरे होतात, आणि आनंदोत्सव होतो. पण हळूहळू लक्षात येतं की या आनंदाला काहीसा उथळपणा आहे. जीवनाच्या आणखी एका वर्षाच्या समाप्तीवर आपण किती विचार करतो? एका वर्षाचा मृत्यू झाला आहे आणि आपण एक वर्ष अधिक जिवंत राहिलो याचा अर्थ आपण मृत्यूच्या अधिक जवळ गेलो. मग ही चकाकी कशासाठी? या प्रश्नाचा विचार करायला हवाच.


    जीवन म्हणजे एक परीक्षा आहे. कुरआन मध्ये अल्लाह म्हणतो की,


   “मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी.”


(सूरा-अज्-झारियात: 56)


     आपल्या अस्तित्वाचा उद्देश अल्लाहच्या आज्ञेचे पालन आणि त्याच्या उपासनेत आहे. हा उद्देश विसरल्यामुळेच आपण वेळ आणि संसाधनांचा अपव्यय करतो. नवीन वर्ष हे आपल्या अस्तित्वाच्या या प्राथमिक उद्देशाकडे आपले लक्ष वेधते.


    जीवन म्हणजे एक प्रवाही नदी, जी आपल्या कर्मांनुसार आपल्याला स्वर्ग किंवा नरकाच्या किनाऱ्यावर नेते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपण केवळ या क्षणभंगुर जीवनासाठी जगत नाही, तर आपल्या शाश्वत जीवनाची तयारी करत आहोत.


     वेळ हा एक अमूल्य खजिना आहे, जो आपल्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच दिला जातो. प्रत्येक क्षण हे एक संधी असते, जेव्हा आपण नवनिर्मिती करू शकतो, सत्कर्म करू शकतो आणि आपल्या आत्म्याला शुद्ध करू शकतो. वेळेचा योग्य उपयोग न केल्यास तो आपल्याला पश्चात्तापाशिवाय काहीच देत नाही. नवीन वर्षाचा संदेश म्हणजे हा वेळ वाया न घालवण्याचा, तर त्याला सत्कर्मी लावण्याचा आहे.


     नववर्षाची सुरूवात ही फक्त नव्या संकल्पांची वेळ नसून, स्वतःच्या चुका ओळखून त्यांना सुधारण्याची वेळ आहे. आपल्याला आपल्या जीवनातील काही प्रश्न विचारायला हवेत,


      आपण आपला वेळ कुठे वाया घालवतो आहोत?


       आपण आपल्या कर्तव्यांपासून किती दूर गेलो आहोत?


        आपले जीवन अल्लाहच्या इच्छेनुसार आहे का?


     या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणं आणि त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणं, हेच खरे आत्मसुधारणेचे पहिले पाऊल आहे.


     नवीन वर्ष हे केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजासाठीही योगदान देण्याचा संकल्प करायला हवा. आपल्या आसपास गरजू, दुःखी आणि एकाकी लोक आहेत. त्यांच्या जीवनात सुख, आनंद आणि समाधान निर्माण करणे, हेच नववर्षाचे स्वागत आहे


     गरजू व्यक्तींना मदत करा.अनाथ आणि वृद्धांसाठी आधार बनून त्यांच्या जीवनात प्रकाश आणा.


आपल्या शेजाऱ्यांच्या गरजा जाणून घ्या आणि त्यांना मदत करा.


         कुरआन म्हणते,


     “ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले. परंतु त्यांची अवस्था अशी आहे की आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत.”


       ( दिव्य कुरआन सूरा-अल-मायदा: 32)


      आपल्या अंतःकरणातील कटुता, द्वेष, आणि अहंकार दूर करा. क्षमा हा फक्त दुसऱ्याला सुख देत नाही, तर आपल्यालाही शांतता देतो. नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये क्षमाशीलता ही आपली पहिली निवड असावी.


     नववर्ष कसे घालवावे?


     नवीन वर्ष म्हणजे नव्या सुरुवातीचा काळ.


दररोज अल्लाहचे स्मरण करा आणि त्याची प्रार्थना करा. कुरआन वाचा, समजून घ्या आणि त्यावर आचरण करा.समाजासाठी योगदान द्या: गरजूंची मदत करा, सत्कर्म करा.स्वतःच्या आत्म्याला शुद्ध करा. आपल्या चुका ओळखा आणि त्यावर मात करा.प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. वेळेचे महत्त्व जाणून त्याचा सदुपयोग करा.


    जीवनाचे खरे यश हे आत्मशोध आणि आत्मसुधारणेच्या प्रवासात आहे. नवीन वर्ष हा फक्त आनंद साजरा करण्याचा काळ नाही, तर आत्मपरीक्षण करण्याचा आणि स्वतःला पुन्हा घडवण्याचा प्रसंग आहे.


    "आपले अंतःकरण शुद्ध करा, कारण शुद्ध अंतःकरणच अल्लाहच्या जवळ जाते. आपल्या विचारांना पवित्र करा, कारण पवित्र विचारच जीवनाच्या अर्थाला उजाळा देतात. आणि आपल्या कृतींना योग्य मार्गावर ठेवा, कारण त्या कृती आपल्याला स्वर्गाच्या जवळ नेतात."


     हे नवीन वर्ष आपल्या जीवनाला नव्या दिशेने नेवो, आपल्या अंतःकरणाला अल्लाहच्या स्मरणाने उजळवो, आणि आपल्या श्वासांना एक अर्थपूर्ण दिशा देवो. अल्लाह आपल्याला त्याच्या कृपेने उज्ज्वल मार्ग दाखवो.


    “ काळाची शपथ,मानव वस्तुतः तोट्यात आहे,


त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.”


           (दिव्य कुरआन: सुरह:103)



आसिफ खान


धामणगाव बढे


9405932295

bottom of page