30 November 2024
मुंबई,दादर रेल्वे स्थानक पूर्व येथील हनुमान मंदिराच्या बाहेर दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी ‘भिम आर्मी, मुंबई’ संघटनेच्या वतीने "भारत देशात बॅलेट वर निवडणुका झाल्या पाहिजेत व E.V.M वर निवडणुका बॅन झाल्या पाहिजेत"या मागणीसाठी निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. यासंदर्भात मुंबई पोलीसांनी जमावबंदी आदेश लागू करत इशारा दिला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी जमावबंदी आदेश क्र. पोआ/११ (६)/ (१६)/ए.पी./३७(३)/१०(२)/२०२४ जारी केला आहे. हा आदेश दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १२:०१ वाजल्यापासून ६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत लागू राहील. आदेशाच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचे जमाव, निदर्शने किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, माटुंगा पोलीस ठाणे यांनी भिम आर्मीला दिलेल्या नोटीसीत नमूद केले आहे की, दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात नियमितपणे प्रवाशांची गर्दी आणि रहदारी असते. निदर्शनांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच, जमावाकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास संघटनेच्या पदाधिकारी व आयोजकांना जबाबदार धरले जाईल.
पोलीसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, निदर्शनांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता आणि इतर कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल. या नोटीसचा उपयोग भविष्यात पुरावा म्हणून केला जाईल.