top of page

दहिसर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेवर आरोप; निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण

26 November 2024


मुंबई,महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील 153 - दहिसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्री. राजेश गंगाराम येरुणकर यांनी मतमोजणीसंदर्भात समाजमाध्यमांवरून विविध आरोप केले होते. या आरोपांमध्ये 17C आणि ईव्हीएम संयंत्रातील आकडेवारीत विसंगती, मतमोजणीवेळी कंट्रोल युनिटची 99 टक्के बॅटरी क्षमता, कॅरींग केस सीलसंबंधित त्रुटी, आणि निवडणूक प्रक्रियेत फक्त दोन मते मिळाल्याची तक्रार होती.

याबाबत निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे:

• 17C आणि ईव्हीएम डेटा जुळत नसल्याचा आरोप खोटा:

17C फॉर्म आणि ईव्हीएम यामधील मतदानाची आकडेवारी तसेच मशीन क्रमांक तंतोतंत जुळत आहेत. मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना 17C ची प्रत देण्यात आली होती. तसेच मतदान दिवस, 17A छाननी, आणि मतमोजणी दिवशी कोणतीही लेखी तक्रार संबंधित कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही.

• 99% बॅटरी क्षमतेवर स्पष्टीकरण:

निवडणूक आयोगाच्या FAQs नुसार, कमी वापर झाल्यास ईव्हीएमच्या बॅटरीची क्षमता 99% दाखवते. ईव्हीएम पॉवर पॅक डिझाइन 2000 मतांसाठी सक्षम आहे. त्यामुळे कमी मतदान किंवा कमी उपकरणे वापरल्यास बॅटरीची पातळी हळूहळू कमी होते.

• कॅरींग केस सील व्यवस्थित:

ईव्हीएम कॅरींग केसला सील योग्य प्रकारे लावण्यात आले होते, आणि सील उघडल्यावर 17C व ईव्हीएम मतदान आकडेवारीत कोणतीही विसंगती आढळली नाही.

• उमेदवाराच्या मतांबाबत तक्रारी तथ्यहीन:

उमेदवार व त्यांच्या कुटुंबाचा समावेश मतदार यादीत आहे. मतमोजणीदरम्यान फॉर्म 17C भाग 2 नुसार त्यांना प्रत्यक्षात 53 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. फक्त 2 मते मिळाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे दिसून आले.

निवडणूक आयोगाच्या या स्पष्टीकरणानंतर असे ठळकपणे स्पष्ट झाले आहे की, श्री. येरुणकर यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून निवडणूक प्रक्रियेवर कोणताही आक्षेप घेता येणार नाही.

bottom of page