top of page

जे.जे. रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन


जे.जे. रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन
जे.जे. रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन

मुंबई, दि. 28 ऑगस्ट: मुंबईतील प्रसिद्ध जे.जे. रुग्णालयात आज अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल (निवृत्त) याकोव्ह ब्लिटश्टाइन यांच्या हस्ते या अत्याधुनिक कक्षाचे उद्घाटन झाले. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.


या उपक्रमासाठी इस्त्रायलच्या डीप-टेक कंपनी नॅनोसोनोने निर्लाटच्या सहकार्याने विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगत प्रतिजैविक ऍक्रेलिक पेंटचा वापर करण्यात आला आहे, जो काही तासांत 99.99% जीवाणू आणि विषाणू यांना निष्क्रिय करण्यास सक्षम आहे. "QUACTIV™️" या नावाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे पेंट भिंतींवर जोपर्यंत राहते तोपर्यंत हानिकारक सूक्ष्मजीवांपासून सतत संरक्षण मिळते.


उद्घाटन प्रसंगी बोलताना कर्नल ब्लिटश्टाइन म्हणाले, "जे.जे. हॉस्पिटलमध्ये या प्रगत प्रतिजैविक आणीबाणी कक्षाचे उद्घाटन इस्रायल आणि भारत यांच्या आरोग्य सेवेत सहकार्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारतातील रुग्णांची सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल."


इस्त्रायलचे मुंबईतील कौन्सुल जनरल श्री. कोबी शोशानी यांनीही या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील आरोग्य सहकार्यात आणखी वृद्धी होईल, असा विश्वास व्यक्त केला.


जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले की, "या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांची सुरक्षा सुनिश्चित होईल. 'QUACTIV™️' प्रतिजैविक पेंटच्या अंमलबजावणीमुळे आमच्या रुग्णांना संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यात मदत होईल."


नॅनोसोनोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओरी बार चेम यांनी या तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण परिणामावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "QUACTIV™️ तंत्रज्ञान संक्रमण नियंत्रणातील एक महत्वपूर्ण प्रगती आहे, आणि भारतात त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल याची खात्री आहे."


या तंत्रज्ञानामुळे जे.जे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रण अधिक मजबूत होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

Comments


bottom of page