top of page

जात-धर्मात गुंतवून लोकशाही पोखरण्याचा डाव उधळून लावा

नरेंद्र वाबळे यांचे भारताच्या नागरिकांना आवाहन.

जात - धर्माच्या अस्मिता बळकट करून लोकशाही पोखरण्याचे कारस्थान कांही धर्मांध शक्तींकडून सुरू आहे. अशा शक्तीच राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्याबद्दल नकारात्मक विचार समाजात पेरत आहेत. आंम्ही भारताचे लोक म्हणून घेणा-या लोकशाही प्रेमी नागरिकांनी एकत्रित येऊन हे कारस्थान उधळून लावावे असे आवाहन, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी केले. संविधान समता दिंडी आयोजित राष्ट्रचेतना अभियानाच्या सांगता सोहळ्यात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

आपलं संविधान इतकं मजबूत आहे की इथली लोकशाही संपवण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. आपण सगळे मिळून या संविधानाचे रक्षण करुन या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात जे काही चालू आहे त्याचे मूळ जात-धर्म हेच आहे असे आग्रही प्रतिपादन करून वाबळे पुढे म्हणाले की, जात ही समूळ गेली पाहिजे आणि त्यासाठी सत्यशोधक समाजाचे विचार पुढे आले पाहिजेत. सत्यशोधक समाजाचे विचार मागे पडले म्हणून नको त्या शक्ती पुढे आल्या. सत्यशोधक समाजाला सप्टेंबरमध्ये १५० वर्ष पूर्ण होत आहेत असे सांगून सत्यशोधक विचारांचा जोरदार जागर करुया आणि जात-धर्माच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे आवाहन वाबळे यांनी उपस्थितांना केले.

संताचे विचार, संविधान, तिरंगा याला एखादा विकृत माणूस आव्हान देतो आणि आम्ही काहीच करु शकत नाही याची खंत माजी पोलीस आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केली. संताचे विचार, संविधान मागे का पडतंय याची कारणं शोधून त्यावर इलाज करायला हवा. शिक्षणपध्दती व संगोपन पध्दती कालबाह्य झाली आहे तिला पर्याय दिला पाहिजे, ज्यात संविधान शिक्षण देता आलं पाहिजे. ही व्यवस्था बदलायची तर कोणी? आत्ता नाहीतर कधी? असा सवाल त्यांनी केला. हे वातावरण बदलण्यासाठी मी इथे आलोय. तुमच्या सगळ्यांच्या सोबत मी आहे असे आश्वासन खोपडे यांनी याप्रसंगी दिले.

गेली १० वर्ष एकदिवस तरी वारी अनुभवावी म्हणत एक दिवसीय समता वारीचे आयोजन करणारे शरद कदम यांनी या कार्यक्रमात राष्ट्रचेतना अभियान राबविणाऱ्या किर्तनकारांना सलाम करायला आम्ही कार्यकर्ते आलोय अशी भावना व्यक्त केली. तिरंगा नाकारणारे, राष्ट्रपुरुष नाकारणारे त्यांचा अजेंडा राबवतात, तेव्हा अशा अभियानात ताकदीने उतरण्याची गरज असते. सुफी संत, बसवण्णांचा भक्तीसंप्रदाय व महानुभाव भक्तीसंपद्राय तसेच वारकरी परंपरा या साऱ्या भक्ती परंपरा एकत्र कशा येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत असे सांगून त्यांनी पुढच्या कठीण काळात एकत्रितपणे लढण्याची गरज अधोरेखित केली.

दादामहाराज पनवेलकर यांनी या अभियानातले अनुभव कथन केले व या अभियानाच्या पुढच्या टप्प्यात आपले पूर्णतः योगदान राहिल असे जाहिर केले. मुंबई येथील वसंतदादा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य रमेश देशमुख यांनी या राष्ट्रचेतना अभियानात सामिल सर्वांचे आभार मानले आणि अजूनही आशेचा किरण आहे असे सकारात्मक भाष्य केले. या अभियानातील पत्रकारांच्या भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

निवृत्त पोलिस अधिकारी आणि जेष्ठ कवी रमेश आव्हाड यांनी आजचा हा कार्यक्रम हा समतेचा वटवृक्ष महाराष्ट्रभर रुजवणारा आहे असे सांगून त्यांनी आपल्या आसपासचा अंधार वाढत चालला तर गळ्यापर्यंत येईल हे लक्षात ठेवले पाहिजे असा इशारा देत आपल्या कवितांतून परखड मांडणी केली.

भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतिकांचा इतिहास आणि महत्त्व समाजात रुजविण्यासाठी विवेकी वारकरी संघटनांनी पंढरपूर येथून सुरू केलेल्या संविधान समता दिंडी आयोजित राष्ट्र चेतना अभियानाचा सांगता सोहळा मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईत संपन्न झाला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित या सांगता सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी भूषविले. विचारमंचावर यावेळी माजी पोलिस आयुक्त सुरेश खोपडे, शरद कदम, दादा महाराज पनवेलकर, ज्येष्ठ कवी रमेश आव्हाड, भारत महाराज घोगरे गुरुजी, सिरत सातपुते, रमेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले.

काय आहे राष्ट्र चेतना अभियानात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह. भ. प. भरत महाराज घोगरे गुरुजी यांनी केले. राष्ट्र चेतना अभियनाची संकल्पना त्यांनी प्रास्ताविकेत स्पष्ट केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यांच्या त्यागातून स्वतंत्र झालेल्या देशाने अत्यल्प काळात आपले संविधान तयार केले. राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा झेंडा स्विकारला, राष्ट्रगीत म्हणून जन गण मन हे गीत स्वीकारले, इतर काही राष्ट्रीय प्रतिके स्विकारली. मात्र ज्या शक्तींचा स्वातंत्र्य संग्रामात आणि या प्रतिकांच्या निर्मितीत काहीच सहभाग नव्हता असे लोक स्वातंत्र्यदिनापासून ते राष्ट्रध्वज, राष्ट्रगीतापर्यंत सर्वच गोष्टींबद्दल नकारात्मक बोलत आहेत. हे लक्षात आल्यानंतर या राष्ट्रीय प्रतिकांचे महत्व, इतिहास लोकांपर्यंत पोहचविण्याची संकल्पना संविधान समता दिंडीचे संचालक ह.भ.प. शामसुदर महाराज सोन्नर यांनी मांडली. संयोजक म्हणून त्याची जबाबदारी ह.भ.प. भारत घोगरे गुरुजी यांनी स्वीकारली.

Comments


bottom of page