top of page

जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: आमदार किशोर पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

15NOVEMBER 2024


जळगाव: पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. विद्यमान आमदार किशोर धनसिंग पाटील यांच्यासह अजयकुमार जैयस्वाल, शरद पाटील, सुमित सावंत, व चरणसिंग पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४, ५०६, १२० (ब), ३४ आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियम २०१७ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणाची सुरुवात २९ जुलै २०२३ रोजी गोंडगाव येथे एका बालिकेच्या अपहरण व हत्येच्या घटनेपासून झाली. यावर तातडीने न्याय मिळावा यासाठी भडगावमध्ये शांततामय मुक मोर्चा काढण्यात आला. मात्र, पत्रकार महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या अश्वासनांबाबत बातमी प्रसिद्ध करताना केलेल्या विधानावरून वाद उद्भवला. 

महाजन यांना धमकी व नंतर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. अखेर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला, ज्यानंतर न्यायालयाने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. 

सत्र न्यायालयाचे हे आदेश पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मोठा टप्पा मानला जात असून, संदीप महाजन यांचे वकील परेश पाटील यांनी न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे.

bottom of page