top of page

जनतेची मानसिकता परिवर्तनाकडे; मविआला बहुमताने विजय मिळेल - रमेश चेन्नीथला


जनतेची मानसिकता परिवर्तनाकडे; मविआला बहुमताने विजय मिळेल - रमेश चेन्नीथला
जनतेची मानसिकता परिवर्तनाकडे; मविआला बहुमताने विजय मिळेल - रमेश चेन्नीथला

मुंबई, ६ सप्टेंबर: राज्यात सत्तांतर करण्यासाठी जनतेची मानसिकता तयार झाली असून महाराष्ट्र विकास आघाडी (मविआ) आगामी विधानसभा निवडणुकीत २/३ बहुमताने विजय मिळवेल, असा ठाम विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला यांनी हे विधान केले.

चेन्नीथला म्हणाले की, "राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खालावली आहे. महिलांवरील अत्याचार, हत्या, दरोडे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात तीन दिवसांत दोन हत्यांच्या घटना घडल्या आहेत. महागाईने जनतेचा जीव गुदमरला आहे, सण साजरे करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जनता सत्ताधारी महायुती सरकारला सत्तेतून हटवण्यास तयार आहे."

या परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाडा व विदर्भातील पूरस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. "१२ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले असून १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रस्ते, पूल वाहून गेले आहेत. केंद्र सरकारने गुजरात आणि आंध्र प्रदेशात पूरस्थितीवर पाहणी पथके पाठवली असताना महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर कोणतेही पथक पाठवले नाही," असे पटोले म्हणाले. त्यांनी केंद्र सरकारवर महाराष्ट्राशी सापत्नभावाची वागणूक दिल्याचा आरोप केला आणि भाजपा युतीच्या नेत्यांनी केंद्राकडे मदत का मागत नाही, असा सवाल उपस्थित केला.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, "राज्यात गुंतवणूक वाढत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असले तरी बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणाचे उत्तर ते देत नाहीत."

या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments


bottom of page