top of page

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे 'जोडे मारो' आंदोलन


मुंबई, १ सप्टेंबर - मालवणमधील राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असा भव्य मोर्चा काढून 'जोडे मारो' आंदोलन केले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. छत्रपती शाहू महाराज आणि इतर अनेक प्रमुख नेते तसेच हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करताना म्हटले की, "भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला आहे. शिवरायांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर त्यांचा अपमान करायचा, ही भाजपची पेशवाई वृत्ती आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करताना म्हटले की, "राजकोट किल्यावरील पुतळा कोसळणे ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, भ्रष्टाचाराचा नमुना आहे. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींचा अपमान झाला आहे, आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे."

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या माफी मागण्यावर भाष्य करताना म्हटले की, "पंतप्रधानांनी माफी मागितली, पण त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका."

खा. छत्रपती शाहू महाराज यांनीही शिवरायांच्या पुतळा कोसळल्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्याचे सांगत, "महाराजांचा मान राखला गेला पाहिजे, आणि ज्यांनी हा अपमान केला त्यांना माफी नाही," असे ठाम मत व्यक्त केले.

हुतात्मा चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला, जिथे शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केले आणि त्यांच्यावरील श्रद्धा व्यक्त केली.

Comments


bottom of page