top of page

"चल हल्ला बोल" आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवला

11 March 2025


सचिन उन्हाळेकर


मुंबई,सेन्सॉर बोर्डाने नाकारलेल्या "चल हल्ला बोल" या चित्रपटाने दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार जिंकत मोठा विजय मिळवला आहे. बॉलीवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि स्टार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता येथे या चित्रपटाला सर्वोच्च सन्मान मिळाला.

८ आणि ९ मार्च रोजी अंधेरी येथे भरलेल्या बॉलीवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (महेश बनसोडे) या प्रमुख पुरस्कारांनी "चल हल्ला बोल" सन्मानित झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या महोत्सवात प्रेक्षकांनी चित्रपटाचे उभ्या राहून स्वागत केले. थिएटर तुडुंब भरले होते, आणि छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.

याचप्रमाणे स्टार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कोलकाता येथेही "चल हल्ला बोल" ने सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावले. समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कथानकाचे आणि सामाजिक संदेशाचे विशेष कौतुक केले.


पुरस्कार स्वीकारताना दिग्दर्शक महेश बनसोडे म्हणाले, "हा चित्रपट उपेक्षित समुदायांच्या संघर्षाची आणि त्यांच्या लढ्याची कहाणी सांगतो. हा पुरस्कार त्यांच्या सन्मानासाठी आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट सामाजिक न्यायासाठी प्रेरणा देत राहील."

"चल हल्ला बोल" हा भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. जातीयता, पितृसत्ता आणि सामाजिक असमानता यासारख्या ज्वलंत विषयांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आशा आणि प्रतिकाराचे प्रतीक ठरत आहे.


भारतीय सेन्सॉर बोर्डाने पदमश्री नामदेव ढसाळ यांची कविता असल्याने चित्रपटावर आक्षेप घेतला, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये धडाक्यात पुढे जात आहे. सामाजिक बदल घडवण्याच्या दिशेने "चल हल्ला बोल" एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे.


#चल_हल्ला_बोल #आंतरराष्ट्रीय_पुरस्कार #महेश_बनसोडे #सामाजिक_न्याय #भारतीय_चित्रपट #महिला_सक्षमीकरण #जातीय_असमानता

bottom of page