top of page

खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांना यश, राजावाडी रुग्णालयाचा कायापालट होणार

खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांना यश, राजावाडी रुग्णालयाचा कायापालट होणार
संजय दिना पाटील

मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी): ईशान्य मुंबईतील आरोग्य सुविधांची दुरवस्था हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ज्वलंत मुद्दा आहे. मानखुर्द, शिवाजी नगर, गोवंडी ते मुलुंड या भागातील नागरिकांना सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना राजावाडी, सायन किंवा केईएम रुग्णालयात धाव घ्यावी लागते. या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत आवाज उठवला होता.


खा. पाटील यांनी हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारातदेखील जोरदारपणे मांडला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभेत ईशान्य मुंबईतील रुग्णालयांच्या दुरवस्थेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुलुंड, कांजुरमार्ग, आणि शिवाजी नगर येथे असलेल्या डम्पिंग ग्राऊंडमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चांगल्या आरोग्य सेवांची कमतरता असल्याने स्थानिक नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या अंतरावरच्या रुग्णालयात जावे लागते. राजावाडी आणि सायन रुग्णालयातदेखील अनेक समस्या असल्याने रुग्णांची गैरसोय होते, असे खा. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.


या प्रश्नावर खा. पाटील यांनी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत चर्चा केली आणि सरकारच्या कार्यप्रणालीवर कडाडून टीका केली. त्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भुषण गगराणी यांची भेट घेतली आणि ईशान्य मुंबईतील रुग्णालयांच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या.


आयुक्त भुषण गगराणी यांनी या तक्रारीची दखल घेतली असून राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७०० कोटी रुपयांची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. या पुनर्विकासाच्या अंतर्गत रुग्णालयातील खाटांची संख्या ५०० वरून १२०० करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या क्षेत्रफळातही वाढ करून अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


खा. संजय दिना पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे ईशान्य मुंबईतील नागरिकांना आता आधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाची सेवा मिळणार आहे. या निर्णयामुळे आरोग्यसेवांमध्ये आमूलाग्र बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments


bottom of page