कोल्हापूर, ५ ऑक्टोबर २०२४: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते आज कोल्हापूरच्या कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांचे विचार देशाच्या संविधानात प्रतिबिंबित असल्याचे मत व्यक्त केले.
राहुल गांधी म्हणाले, "शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते, तर देशाचे संविधानच अस्तित्वात आले नसते. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढा दिला, आणि त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत." त्यांनी देशातील दोन विरोधी विचारधारांचा उल्लेख करत, एका विचारधारेने संविधान टिकवण्याचा आणि सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले, तर दुसरी विचारधारा संविधान नष्ट करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप केला.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि त्यांच्या न्यायप्रिय राजवटीची महती सांगितली. "शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि त्यांच्या शिकवणुकीतून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी," असे वडेट्टीवार म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून झाले. पुतळ्याचे शिल्पकार सचिन घारगे यांचे योगदान कौतुकास्पद ठरले.
या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.