मुंबई,केंद्र सरकारने कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. नव्या धोरणांतर्गत, खाद्यतेलाच्या आयातीवर २०% शुल्क लावण्यात आले आहे, ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल, आणि पाम तेलावरील कस्टम शुल्क १२.५% वरून ३२.५% करण्यात आले आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. तसेच, कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क ४०% वरून २०% करण्यात आले असून, किमान निर्यात किंमत (एमईपी) रद्द करण्यात आली आहे. या बदलामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल. बासमती तांदळाच्या निर्यातीवरील किमान निर्यात किंमतदेखील हटवल्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयांना "शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक" असे संबोधले आहे.