top of page

कुलाबा कॉझवे येथे आंतरराष्ट्रीय हॉकिंग स्टॉल चा उद्घाटन कुलाब्याच्या सौंदर्यात होणार सुधारणा , असे आणखी 187 स्टॉल लवकरच बसविण्यात येतील.

मुंबई,2 ऑक्टोबर 2024,कुलाबा कॉझवे सुशोभीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज कुलाबा कॉझवे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेरीवाला स्टॉलचे उद्घाटन केले. स्टँडर्ड हॉकिंग स्टॉल्स आणि दुकानाच्या नावाचे फलक यातून कुलाबा कॉझवेचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.या पथदर्शी स्टॉलचे उद्घाटन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, या स्टॉलची रचना एका तज्ज्ञाने केली आहे. स्थानिक फेरीवाल्यांसाठी लागणारी सोय अधोरेखित केली आहे. कॉझवेच्या बाजूने स्टॉल्स आणि दुकानाच्या नावाचे फलक यांचे स्वरूप प्रमाणित करणे आणि पर्यटनाला चालना देणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त, कॉझवेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रहिवाशांना दिलासा देण्यासाठी योजना आहेत, असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. हॉकिंग स्टॉल्स व्यतिरिक्त, या प्रकल्पात फुटपाथ सुधारणे आणि पर्यटकांना परिसराचे आकर्षण वाढविण्यासाठी नवीन विद्युतयोजना बसवणे यांचा समावेश आहे. या पथदर्शी स्टॉलला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास असे आणखी 187 स्टॉल्स खरेदी केले जातील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी फेरीवाला स्टॉल्ससाठी ₹ 2.5 कोटी दिले होते. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.

*कसा आहे स्टॉल आणि तो कोणाला दिला*

आजचा हा पहिला पथदर्शी स्टॉल 51 वर्षीय मुनावर अली यांना देण्यात आला. ते गेल्या 28 वर्षांपासून कॉझवे येथे रेडिमेड कपड्यांचा स्टॉल चालवतात. कुलाबा कॉझवे टुरिझम हॉकर्स स्टॉल युनियन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी आम्हाला हा आधुनिक स्टॉल मिळवून दिल्याबद्दल आभारी आहे. त्यात पावसासाठी शेड सुद्धा आहे. या 5x3 फुटांच्या स्टॉलमध्ये आमचे सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागेची सोय केली आहे. स्टॉलमध्ये खाली चाके असल्यामुळे हलविण्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहे, असेही अली यांनी नमूद केले.

*कुलाबा कॉझवे सुशोभीकरण प्रकल्प महापालिकेने रखडवला - मकरंद नार्वेकर*

भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) सुशोभीकरण प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला. सुशोभीकरणामध्ये पादचारी मार्ग, ज्याला यापूर्वी बीएमसीने मंजुरी दिली होती आणि त्यासाठी निधी मंजूर केला होता, तो आता कोणत्याही कारणाशिवाय रखडवून ठेवला आहे, असे मकरंद नार्वेकर यांनी नमूद केले.

मकरंद नार्वेकर यांनी नुकतेच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून निधी स्थगित केल्याने आणि त्याचा कुलाब्यातील रहिवाशांवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत भीती व्यक्त केली आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुलाबा कॉझवे गतवैभव प्राप्त करून देण्यावर त्यांनी भर दिला. तथापि, त्यांनी अनपेक्षित विलंबाबद्दल संताप व्यक्त करत प्रकल्पाची सुरळीत प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही अडचणी किंवा समस्या कळवाव्यात असे आवाहन पालिकेला केले आहे.

Comments


bottom of page