top of page

किनारी रस्ता प्रकल्पाची निर्मिती करण्याचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य यांचा आभारपर सत्कार, प्रकल्पामुळे महानगरपालिकेच्‍या शिरपेचात मानाचा तुरा : राहूल शेवाळे

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाची निर्मिती करण्याचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, तसेच तत्कालीन महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांचा आभारपर सत्कार समारंभ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात आज पार पडला. त्‍यावेळी ते बोलत होते.


समारंभाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे होते. तत्‍कालीन स्‍थायी समिती सदस्‍य श्री. विठ्ठल खरटमोल, श्रीमती तृष्णा विश्वासराव, श्री. प्रवीण छेडा, श्रीमती ज्योत्स्ना दिघे, श्री. संदीप देशपांडे, श्री. दिलीप पटेल, श्री. धनंजय पिसाळ, श्री. सुनील मोरे, श्रीमती शीतल अशोक म्हात्रे, श्री. मो. सिराज मो. इकबाल शेख यांच्‍यासह तत्‍कालीन नगरसेवक श्रीमती शीतल मुकेश म्‍हात्रे तसेच अभियंता, अधिकारीवृंद उपस्थित होते. यावेळी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे संगणकीय सादरीकरण आणि तत्‍कालीन स्‍थायी समितीला सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पाची चित्रफीत दाखविण्‍यात आली.

खासदार श्री. राहूल शेवाळे म्‍हणाले की, दर्जेदार नागरी सेवासुविधांसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका देशातच नव्‍हे तर आशिया खंडात नावाजलेली आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्‍ते - उड्डाणपूल या पायाभूत सुविधांसह आरोग्‍य, शालेय शिक्षण या क्षेत्रातदेखील बृहन्‍मुंबई महानगरपालिका अग्रेसर आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्‍पामुळे तर आता बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईच्‍या विकासासाठी सर्वपक्षीयांचे राजकीय मतैक्‍य, तत्‍कालीन पदाधिकारी - अधिकारी यांचे अथक प्रयत्‍न यांमुळे प्रकल्‍प पूर्तता होत आहे, त्‍याचा सार्थ अभिमान आहे. लोकप्रतिनिधींबरोबरच तत्‍कालीन आयुक्‍त, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍तांचे या मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पात महत्‍त्‍वाचे योगदान आहे. मुंबईकरांचा दिवसातील बहुतांशी वेळ प्रवासात जातो. या प्रकल्‍पामुळे वेळेची बचत होणार आहे. हा वेळ आता कुटुंबियांसह आनंदाने क्षण म्हणून व्‍यतित करता येईल, असेही श्री. राहूल शेवाळे म्‍हणाले.


Comments


bottom of page