top of page

काँग्रेसचा बदलापूर प्रकरणी मंत्रालयावर धडक मोर्चा: महायुती सरकारवर तीव्र टीका


मुंबई, दि. 21 ऑगस्ट: बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका करत म्हटले की, महायुती सरकार म्हणजे "एसआयटी सरकार" आहे. कोणतीही घटना घडली की सरकारकडून लगेच एसआयटीची घोषणा केली जाते, परंतु योग्य ती कारवाई होत नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे फक्त एक फार्स आहे, असा आरोप त्यांनी केला.

या मोर्चादरम्यान, पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडविल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार अस्लम शेख, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. वडेट्टीवार यांनी सरकारने बदलापूर प्रकरणात नेमलेल्या विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या नियुक्तीवरही आक्षेप घेतला आहे. त्यांनी विचारले की, "या प्रकरणात न्याय मिळेल का? जर हे प्रकरण दाबले गेले तर जबाबदार कोण?" याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, असं त्यांनी ठणकावलं.

श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बदलापूर येथील शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे, आणि त्याच पक्षाच्या वकिलाची या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशा नेमणुकीवर त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे.

विरोधकांचं आंदोलन म्हणजे राजकारण असा आरोप करणाऱ्या सरकारवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, "कलकत्त्यात अशा घटना घडल्यावर भाजप आंदोलन करते तेव्हा ते राजकारण नसतं का? आम्ही आंदोलन केलं की ते राजकारण कसं होतं?"

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.

Comments


bottom of page