top of page

काँग्रेस सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करू: नाना पटोले


नाना पटोले काँग्रेसच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देतात. भाजपवर गंभीर आरोप!
नाना पटोले काँग्रेसच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देतात. भाजपवर गंभीर आरोप!

मुंबई/शिर्डी, १५ सप्टेंबरकाँग्रेसने आश्वासन दिलं आहे की, जर महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आलं, तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डी येथे झालेल्या पेन्शन राज्य अधिवेशनात हे आश्वासन दिलं. त्यांनी भाजप सरकारवर टीका करताना सांगितलं की, जुनी पेन्शन योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, आणि भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

नाना पटोले म्हणाले, "सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हा त्यांचा स्वतःचा पैसा आहे, जो निवृत्तीनंतर त्यांना परत दिला जातो. हे सरकार कोणताही उपकार करत नाही. मात्र, भाजप सरकार म्हणतं की, जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर ताण येईल." यासोबतच त्यांनी अनिल अंबानी यांचं ₹१,७०० कोटींचं कर्ज माफ करताना तिजोरीवर ताण येत नाही का, असा प्रश्न विचारला.

राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत, पण महायुती सरकार ती पदे भरत नाही, असंही पटोले यांनी सांगितलं. काँग्रेसच्या सरकारमध्ये ही रिक्त पदे भरण्याचे आश्वासन देण्यात आलं. त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्याचा उल्लेख करून सांगितलं की, गावखेड्यातील गरीब मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी देशमुख यांनी शाळा सुरू केल्या होत्या, परंतु सध्याचं महायुती सरकार या शाळा बंद करत आहे.

जुनी पेन्शन योजना काँग्रेसच्या काळात सुरु होती, आणि काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये आजही ही योजना लागू आहे. पटोले यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली, म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कारभाराने देश व राज्य मागे गेले आहेत. महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीची गरज आहे.

या अधिवेशनाला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार सुधाकर आडबाले, अभिजित वंजारी, सत्यजित तांबे, किरण सरनाईक, रविकांत तुपकर, नितेश खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

bottom of page