top of page

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्वीकारला कौशल्य विकास विभागाचा कार्यभार

23 December 2024


मुंबई, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागाचा कार्यभार कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज पुन्हा एकदा स्विकारला. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी विभागाच्या पुढील कार्ययोजना आणि ध्येयधोरणांची माहिती दिली.


"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास विभागाची जबाबदारी पुन्हा माझ्यावर सोपवली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे," असे लोढा यांनी सांगितले.


१०० दिवसांत नवीन योजना:


मंत्री लोढा यांनी सांगितले की, "कौशल्य विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाचा प्रकल्प आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील १०० दिवसांत विभागाची प्राथमिक योजना तयार केली जाईल. त्याचबरोबर पहिल्या वर्षात ५ लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे."


वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने योजनांची अंमलबजावणी:


कार्यभार स्वीकारल्यानंतर लोढा यांनी वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. वर्ल्ड बँकेने कौशल्य विकासासाठी २२०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या निधीचा उपयोग औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) उन्नतीकरण, रोजगार प्रशिक्षण आणि इतर उपक्रमांसाठी होईल.


केंद्र सरकारची मदत:


देशभरातील १००० ITI संस्थांच्या सुधारणेसाठी केंद्र सरकारद्वारे योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ITI संस्थांचा समावेश करण्यासाठी मंत्री लोढा लवकरच केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार आहेत.


युवकांसाठी नवे धोरण:


महाराष्ट्रातील युवकांना आधुनिक कौशल्यांची प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी नव्या योजना राबवण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी नमूद केले.


आगामी ५ वर्षांचे ध्येय:


"आम्ही लवकरच पुढील पाच वर्षांसाठी विभागाचे ध्येय निश्चित करू आणि राज्यातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देऊ," असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

video

bottom of page