top of page

उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं - संजय निरुपम


विधानसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न चकनाचूर झालं आहे, असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, पण संजय निरुपम यांच्या मते, त्यांना या शर्यतीतून त्यांच्या मित्र पक्षांनी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) बाहेर केलं आहे.

निरुपम यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेले होते आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याची विनंती केली, पण काँग्रेसने त्यांना स्पष्ट नकार दिला. त्याचबरोबर, शरद पवार यांनी देखील जाहीर केलं की आता आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्याही नावाची घोषणा करणार नाही. निवडणुकीनंतर मिळणाऱ्या आकडेवारीनुसार पुढचं पाऊल उचलू.

षणमुखानंद हॉलमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करण्याची मागणी केली, पण त्यांची तिथे देखील दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी ही शर्यत सोडली, असं निरुपम म्हणाले.

निरुपम यांच्या मते, महाविकास आघाडीमध्ये असलेल्या मनमुटावामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे तीन पक्ष निवडणुकीत टिकणार नाहीत. तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून मोठे वाद होणार आहेत, आणि एकमेकांना कमकुवत करण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील.

दुसरीकडे, महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. पण निरुपम म्हणतात की, शिंदे यांच्या कामगिरीमुळे आणि लोकप्रियतेमुळे महायुती त्यांच्या नेतृत्वातच निवडणुकीला सामोरी जाईल. निवडणुकीनंतर मात्र आकडेवारीनुसार निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संजय निरुपम यांनी असंही म्हटलं की, सध्या एकनाथ शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच महायुती सरकार पुन्हा सत्तेत येईल. तीनही पक्षांच्या सर्व्हेमध्येही हेच दिसून येतं.

Comments


bottom of page